दागिन्याच्या दुकानात गेलो होतो आज...
गेल्या बरोबर माझ्या खिश्याच वजन पाहिल डोळ्यांनी...
मग थोड थांबयला सांगुन तो वजनदार ताईंकडे वळला...
रांगेत वाट बघायची सवय मला जन्माच्या अगोदर पासुन आई बापानी लावली होती
त्यामुळे न सांगताच मी शेवटी जाउन उभा राहिलो...
गार गार वाटताच माझा खिसा साफ गारठुन गेला होता .... काय सांगु...
मग मी पण बावरुन इकडे-तिकडे पाहिल....
काचेच्या पलीकडे खुप स्वप्ने चकाकत होती...
त्यात मी माझ शोधत होतो...
भेटल ते... फक्त दुकानात पोहचे पर्यंत ते अजुन महागल होत....
पण मी पण निर्धार करुन आलो होतो घरुन...
आज तिच्या गोड आश्चर्याच्या हसण्यावर... मी सर्व विकणार...
मग मान वळवली .... दुखायला लागली होती एवढं वर बघुन...
सुंदर पर्या टेबलाच्या पलीकडुन प्रत्येक गिर्हाइकाला हसु वाटत होत्या...
त्यांच्या खिश्याच्या वजना इतकेच अगदि काळजीनी मोजुन...
सोनं विकतात शेवटि.... त्यांचा काटा पण एकदम काटेकोर होता...
कोणाला किती भाव द्यायचा बहुतेक ह्याचा पण कोर्स असेल त्यांचा...
मग मालकाकडे बघितल... तोंडावर हसु ठेउन बसला होता...
त्या हसन्याच बांधकाम मला एकदम भक्कम वाटत होत...
कपाळाच्या आठ्या कमी जास्त होत होत्या पण हसु तेवढच...
त्याच्या हसण्याची मला फार किव आली...
२३ कँरेट दागिन्याच्या मालकाला कोणितरी खोट हसु विंकुन गेल होत...
मोठ्या लोकांना माझी नजर दगा देउन मग टेबलाच्या अलीकडे वळली...
बाप पोरीच्या लग्नाचे दागिने घेत होता ...
पोरीचं हसु तो विकत घेत होता ..
पण कदाचित पैसे कमी घेउन आला होता...
कि पोर स्वप्न महाग बघत होती ....
माहित नाहि ... पण दोघ एकमेकांच हसु बघाण्यासाठी स्वता खोट हसत होते...
समोर आरसापण होता हे मला स्वताला बघितल्यावर उमगलं...
स्वच्छ आरश्यात मळकटलेला माझा अवतार बघुन थोड स्वतावर हसु आलं...
मात्र डोळ्यात मला तीचं हसु दिसत होत..
तितक्यात एका बयेने.... " सर प्लीज कम...." म्हणुन बोलावलं....
मी क्षणभर मागे बघुन तो "सर" मीच ...हे नक्की करुन पुढे सरसावलो....
मग लहान पोर जसं दुकानात बरणी दाखवतात ना तसं बोट दाखवलं...
तीने ते समोर काढुन दाखवलं... डोळे खुदकन हसले होते माझे तेव्हा...
मखमली पेटीत तीच हसु बंद करून .... तीलाच द्यायला घरचा रस्ता धरला..
पेटी उघडली तेव्हा कळलं अरे... माझ हसु तर त्याने फुकट दिलं होत...
ते नेहमी तिच्या हसण्या वऱ मला फुकटात मिळतं ना...
एवढा काय वाईट सौदा केला नव्हता मी...
खोट्या हसण्याच्या बाजारातुन दोन मायेचे दागिने आणले मी...
एक तीच हसु आणि एक माझ हसु....