Total Pageviews

Saturday, 28 June 2014

जुनं घर

थंडगार बगिच्यात बसुन...
वाड्याबाहेरचा पाउस बघत होतो...
परवाच फॉरेनहून मागवलेला कॉफी ...
आणि चॉकलेट कुकीज्...
स्वप्नातल वैभव पायाजवळ लोळत आहे
तरी मनाला अजुनहि कश्याची कमी सलत आहे.

तेवढ्यात..."ती" हातात पैश्याच एक बंडल घेउन आली...
फालतु रद्दी फेकावी तस तीने ते टेबलावर ठेउन म्हणाली..
"सड्यावरच्या झोपडीचे पैसे मिळाले...काय करु?"
मी हिरमुसुन पाहिलं ...खुपच पातळ वाटलं मला ते...

सड्यावर आमचं एक घर होत...
एवढसं माझ्या बापाच घबाड (संपत्ती) होतं..
कुडाच्या चार भिंती ... कौलाच छत... मातीची जमीन...
दोन चार बुडकुली (मातीची भांडी)... एवढं त्याच वैभव होतं...

जन्म माझा तिथला... बालपण त्याच मातीत मुरलं होत...
मोठं व्हायच, काहितरी करायचं स्वप्नपण मला तिथेच पडल होत...

उन्हाळी रात्री फार उकडायच... पण दिवसाचा ताप तेच सोसायचं...
हिवाळ्यात अंगाला अंग लाउन झोपायचो आम्ही...
आता चार खोल्यांचा वाडापण एकट्याला पुरतं नाहि...
पावसाळा आला की घर खुप रडायच...
आसवांच्या थेंबानी सारी जमीन भिजवायचं...

आयुष्याचे सारे खेळ तिथेच शिकलो...
पाहूणे नसतात माणसाला मी तिथेच समजलो...
कालची भाकरी पण गोड वाटायची...
मीठ टाकलेली मिरची भाजी वाटायची...

विकुन टाकल्या त्या भिंती आज...
मोडक्या भुतकाळाची आता वाटु लागली आहे लाज...

तरी त्या आठवणी ... ती स्पदंन ... ते श्वास अजुन तसेच आहेत...
चांगला गिर्हाईक भेटला तर ते पण विकुन टाकेन...
तेवढेच दोन पैसे जास्त मिळतील....

Friday, 27 June 2014

गुलझार


चंद्र मी खुप पाहिले.. कौलांच्या भेगांमधुन...
सुर्य नाहि होत पहायला नागड्या डोळ्यांनी...

गुलझार दररोज नाहि होत ह्या जगात...
सुर्य तितकासा दुर्मिळ नाहि...

Thursday, 26 June 2014

Saturday, 21 June 2014

जात


लपत छपत माळावर आलो...
सोसाट्याच्या वारा असुन चक्क घामाने भिजलो...

एवढी कसली भिती मला ...?
तलवार हातात घेऊन कोणीतरी ...
जात विचारली मला ...

कपाळावर होते टिळे की ....घातली होती टोपी??
माणसच होती ती...की त्या दैत्याच्या प्रजाती??
परकी असेल जर जात... तर त्याला कापुन हे पुढे जात...
म्हणुन कि काय घाबरलो मी....
माणसाचा जन्म माझा ... अन माणुसकी होती माझी जात...

करवंदे

१.
हि रात चांदण्याची...
हि साथ पाखरांची...
हि वाट सावलीची...
मंद पावलांची...


चार शब्दांची एक ओळ होते...
ओळींची गर्दी कागदावर जमते...
पाणि थेंब बनुन मग डोळ्यातुन ओघळते...
काय सांगु किती वेदनांतुन...
माझी एक कविता जन्म घेते...


राग नाहि माझा कोणावर...
पण द्वेश असेल कदाचित...
विश्वास आहे अजुन देवावर...
तरी शंका असेल कदाचित...


काय सांगु किती आहे बचत माझी...
दोन शुष्क अश्रु आहेत ...
हास्याच्या बटव्यात दडवलेले...
सोबत असशील तर तेहि खर्च करेन...तुझ्यावर


शब्दात विणतात किती मोहक इशारे...
पाठलाग नको करु त्यांचा कधी...
उगाच.. उघडे पडतील तुटके धागे...

Friday, 25 April 2014

एका भिंतीच्या पलीकडे

कधीतरी भिंत ओलांडुन उडी मारली होती मी...
मित्रांच्या नादाने .... शाळेतुन पळालो होतो मी...

चपला टाकल्या होत्या पलीकडे अगोदर...
त्याच अंदाजावर स्वतःला पण भिरकावलं होत मी....
कधीतरी भिंत ओलांडुन उडी मारली होती मी..

निघताना काळीज गळ्याजवळ...
आणि काहितरी लागत होत कपाळाजवळ....
तरी खर सांगु...
बाहेर पडल्यापडल्या आभाळ आल होत चपलेजवळ...

दाउदपण आपल्याला बारका वाटला होता...
मुंबई चा किंग पण आपण खिश्यात ठेवला होता...
शर्टाच वरच बटण तेव्हा पासुन लावायच सोडल मी....
कधीतरी भिंत ओलांडुन उडी मारली होती मी..

हि गोष्ट नाहि जर कळली तुला....
तर तु खरच लहान आहेस बाळा...
कधी तरी तु पण उडी मारुन बघ...
बघ काय मजा येइल तुला....

शाळेच्या भिंती गेल्या कधीच्या काळात...
मग किती बांधल्या भिंती तु स्वतःच्या मनात...
हसताना पण असते एक भिंत....
पुन्हा रडु देत नाहि तुला एक भिंत...
दोघांमध्ये पण तु बांधली भिंत ....
एक तुझी भिंत ... आणि एक तिची भिंत...

दे कधी तु भिरकाउन अभिमानाच्या चपला ह्या भिंती वरून...
मग सोपी होईल उडी तुझी ह्या भिंतीवरुन...
घाबरु नको स्वतःला...
कारण भिंतीपलीकडेच तु भेटणार आहेस स्वताःला

भिंती मधे वेड्या अंधार आहे...
सुरक्षित असला तरी ..वेड्या तो पिंजरा आहे....
उजेड आहे ... आणि गारवा पण आहे...
ये लवकर मी अजुन भिंती-पलीकडेच उभा आहे....

Sunday, 16 March 2014

दोन टोक

खिडकीतुन बाहेर पाहत एका कडेवर बसलो होतो...
प्रवास सरळ होता पण नजर माझी रस्त्याच्याकडेवर होती...
नेहमी असाच प्रवास करतो मी...
रस्ता सोडुन नेहमी... मन माझं कडे-कडेने चालतं असतं ...
ते कधीच नाही चालणारं मार्गावर... कडेने चालत असतं...
बावरत असेल कदाचित...कोपरा नेहमी "सेफ" असतो...

असो....
चित्र मागुन चित्रे पळत होती...
मी ती डोळ्यात सावकाश वितळवुन.. मनात ओतुन पुढे सरकत होतो...

एक सुंदर चमकनारी कार चटकन ... नजरे पार निघुन गेली...
थोड्या पुढे गेल्यावर ती परत दिसली...
आत उद्-मादक संग़ीतावर ... तरुणाई सुस्तावलेली दिसली...
गोरी गुलाबाची कोवळी साय जणु गालात दडउन...पोर बेफीकीर बसली होती
पोरानी एक थैली बाहेर फिरकावली ... आणि वार्याहुन वेगाने पसार झाले...

आपली एस. टी. महामंडळाची बस ... तीला कसलीच घाई नव्हती...
ती निवांत.. मी पण बिनकामाचा ... तिकडेच होतो...

बाहेर टाकलेली थैली बघुन... दोन लहान पोरी धावत आल्या...
गरीबाच्या पोरी त्या ... पण लाखोची आशा डोळ्यात ठेउन होत्या...
दोन क्षणाचापण विलंब लावता ... पोरी थैली उघडुन बसल्या...

थैली मध्ये रिकाम्या बाटल्या दिसल्या मला...
एक पोर झटक्यात बोलली... "म्या लिप्-स्टीक घेणार"
दुसरीने तिरक्या नजरेने पाहिलं ... आणि विषय संपवला...

कसल्या बाटल्या होत्या ह्या... विचारु नका ...
पण रिकाम्या असुन त्यांनी ...
क्षणभर आनंद द्यायचा आपला धर्म सोडला नव्हता...

खरच काय सुंदर असते हि बाटली ...
रिकामी असली तरी समाधान देते कोणालातरी...
आणि रिकामी करताना पण मज्जा देते कोणालातरी...